
beed murder case बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय निर्घृण खून झाला. त्यानंतर काही संशयितांना अटक केली असली, तरी या मागील सूत्रधार आणि आणखी संशयित हे फरार आहेत. त्यांना अजूनही अटक झालेली नाही. त्यामुळे या खुनाचा तपास आता सीआयडीकडे सोपविला आहे.
मध्यंतरी विधानसभा अधिवेशनात या विरोधात विरोधी पक्षासह महायुतीतील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आवाज उठवला आणि सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी संशयित सूत्रधाराला अभय दिल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असून त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.
मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांनी बीड जिल्ह्यात घटनास्थळी भेट दिली. तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही असे आश्वासन दिले. या प्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचे आरोप होत असून त्यांचा राजीनामा घ्यावा असा सूर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांनी लावला आहे.
दरम्यान खुनाच्या तपासाला गती येण्यासाठी बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्तांची नियुक्ती केली. तरीही अजून मुख्य सूत्रधार आणि काही आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी सामाजिक दबाव आहे. या सगळ्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता या घटनेचा निषेध म्हणून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.
या दिवशी निघणार मराठा मोर्चा
दिनांक २८ डिसेंबर रोजी दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाज बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत असून त्यात सर्वच समाजातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. या निषेध मोर्चाच्या तयारीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याच्या विविध जिल्ह्यात सध्या बैठका आणि तयारीची सत्रे सुरू असून राज्यभरातून लाखो मराठा बांधव बीडमध्ये जमा होण्याची शक्यता असल्याने प्रशासनावर मोठा दबाव येणार आहे, तसेच सुरुवातीपासूनच हे धनंजय मुंडे यांच्याकडे खुन्यांना आश्रय दिल्याचा आरोप होत असून मोर्चानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होताना दिसत आहेत.