Mother Dairy : विदर्भात दुग्धक्रांतीची नवी पहाट; मदर डेअरीमुळे दूध उत्पादकांना स्थैर्य..

Mother Dairy

Mother Dairy : विदर्भात मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी मदर डेअरीचा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथे मदर डेअरीच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प विदर्भातील दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी मोठी संधी ठरेल, असे सांगितले.

या प्रकल्पासाठी ५५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, विदर्भातील दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर दूध संकलन केले जाईल. त्याच ठिकाणी दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना हमखास बाजारपेठ मिळेल.

गडकरी यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विदर्भातील गाईंच्या वंशसुधारणेसाठी प्रयत्न होणार आहेत. मदर डेअरीने पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने अधिक दूध देणाऱ्या गाई विकसित कराव्यात, यासाठी एम्ब्रो ट्रान्सफर आणि इन विट्रो फर्टिलायझेशन यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. यामुळे स्थानिक पातळीवर अधिक उत्पादन होईल आणि इतर राज्यांतील गाईंची आवश्यकता भासणार नाही.

दुग्ध व्यवसायात टिकून राहण्यासाठी चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध असणे गरजेचे आहे. गडकरी यांनी विदर्भात मुबलक प्रमाणात असलेल्या कापूस सरकी, तुर चुरी, मका आणि नेपियर गवत यांचा वापर करून शेतकऱ्यांसाठी योग्य दरात पशुखाद्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला. वर्षभर हिरवा चारा मिळाल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होईल.

गुजरातमध्ये दररोज ८० लाख लिटर दूध संकलित होते, तर विदर्भ आणि मराठवाड्यात मिळून केवळ ५ लाख लिटर दूध संकलन होते. ही स्थिती बदलण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

याशिवाय, नागपूरच्या प्रसिद्ध संत्रा बर्फीचे देशभरात विपणन करण्याची योजना आखण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून संत्रा पल्प खरेदी करून ही बर्फी तयार केली जाणार आहे, त्यामुळे संत्रा उत्पादकांनाही नवा बाजार मिळणार आहे. गडचिरोली आणि वाशिम यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी मदर डेअरी विशेष प्रयत्न करणार आहे.

या कार्यक्रमाला एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा, दुग्ध उत्पादक, शेतकरी आणि मदर डेअरीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक संधी निर्माण होतील आणि दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

Leave a Reply