Solar energy project : सौर ऊर्जा प्रकल्पामुळे गोकुळ दूध संघाचा वीजेवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून, त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांना मिळणार आहे. दूध शीतगृहे, प्रक्रिया उद्योग आणि वाहतूक यासाठी लागणाऱ्या विजेचा मोठा खर्च सौर ऊर्जेमुळे वाचणार आहे. या बचतीमुळे दूध संघाच्या सभासदांना अधिक चांगले दर मिळू शकतील आणि दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरणार आहे.
देशातील पहिला सहकारी सौर ऊर्जा प्रकल्प करमाळा तालुक्यातील मौजे लिंबेवाडी येथे उभारण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाने ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प स्वमालकीच्या १८ एकर जागेवर कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये गुंतवण्यात आले असून, दर महिन्याला सुमारे ५० लाख रुपयांची विजेवरील बचत होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी सांगितले की, तीन वर्षांनंतर हा प्रकल्प कर्जमुक्त होणार असून, यामुळे गोकुळ दूध संघाच्या महसुलात मोठी वाढ होईल. याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल.
गेल्या काही वर्षांत गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायातील तांत्रिक सुधारणा आणि ऊर्जेची बचत याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवल्यास दूध व्यवसायाचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना जास्त दर मिळण्यास मदत होईल. भविष्यात दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी सौर ऊर्जा हा मोठा पर्याय ठरणार आहे.
गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले की, पुण्यातील एका खासगी कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. महावितरण कंपनीला या प्रकल्पातून निर्मित वीज पुरवली जात आहे आणि १८ किलोमीटरपर्यंत वीज जोडणीचे काम दूध संघाने स्वतः केले आहे.
हा उपक्रम देशभरातील इतर सहकारी संस्थांसाठी एक आदर्श ठरेल. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर केल्यास दुग्धव्यवसाय अधिक स्वयंपूर्ण आणि फायदेशीर होईल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.












