Gopinath munde : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; या योजनेतील अनुदानाची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव..

Gopinath munde :कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतकऱ्यासाठी महत्वाची असून या योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी बैठक झाली. बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उप सचिव राजश्री पाटील यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, ऊस तोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येणारी रक्कम आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान रक्कम यातील तफावत दूर करणे गरजचे आहे. वाहन परवान्याची शासन निर्णयामध्ये असलेली अट शिथील करण्याविषयी प्रस्ताव सादर करावा. अनुदानासाठी अर्ज करण्याची सध्याची ३० दिवसांची मुदत वाढवून ती 1 वर्षापर्यंत करावी. तसेच आणखी एक वर्षापर्यंत विलंब माफ करण्याचा अधिकार शासनाकडे असेल.

योजनेमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव, भ्रमिष्ट यांमुळे मृत्यू झाल्यास मदत देता यावी यासाठी आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन तसा योजनेत समावेश करावा, पात्रतेमध्ये शेतकरी कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ देण्याची तरतूद करावी, योजनेत सून आणि नातवंडांचाही समावेश करावा, विषबाधेमुळे मृत्यूखेरीज इतर कारणांने झालेल्या मृत्यूमध्ये व्हीसेराची असलेली अट शिथील करण्यात यावी. अशा सूचनाही श्री. जयस्वाल यांनी केल्या.

Leave a Reply