
Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकारने दिलेली कर्जमाफीची हमी लवकरच प्रत्यक्षात आणली जाईल. हे आश्वासन केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणार आहे, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले की, कर्जमाफीचा लाभ फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळेल. मोठ्या फार्महाऊस उभारणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळण्याचा सरकारचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून तिच्या अहवालावर पुढील निर्णय घेतले जातील.
या योजनेसोबतच राज्य सरकारने शेतीसंबंधित संसाधन बळकट करण्यावर विशेष भर दिला आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळी बांधण्यात आली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळतोय. यातून अनेक शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला असून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. या बदलत्या परिस्थितीत सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे, ज्यामुळे आता या क्षेत्रातही कर्ज व अनुदानाच्या योजना लागू होतील.
देशात गोड्या पाण्यातील मासेमारीत महाराष्ट्र सध्या १६ व्या स्थानावर आहे, परंतु मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या मते, २०२९ पर्यंत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये असेल. केंद्र सरकारच्या ‘नीलक्रांती’ उपक्रमामुळे राज्याला मोठा निधी मिळणार आहे, ज्याचा वापर गुंतवणूक वाढवण्यासाठी केला जाणार आहे. आंध्र प्रदेशसारख्या आघाडीच्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रही यामध्ये लवकरच आघाडीवर राहणार आहे.