![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/santra.webp)
मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावतीतील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली.यासाठी ३९ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये तीन प्रकारचे प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे..
विदर्भातील नागपूर, अमरावती ,अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत्रा फळांची काढणी पश्चात हाताळणी नुकसान 25 ते 30 टक्के आहे . राज्यात संत्र्यांवर प्रक्रिया करण्याचे प्रमाण नगण्य असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.
त्यामुळे काढणीपश्चात प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी सरकारकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे आणि संत्र्यांची काढणी पश्चात नुकसान कमी होऊन संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळवण्यासाठी संत्र्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची अर्थसंकल्पनात घोषणा केली होती. त्यानुसार नागपूर काटोल ,कळमेश्वर, मोर्शी आणि बुलडाणा येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेसाठी सहकारी प्रक्रिया संस्था. शेतकरी उत्पादक कंपन्या .कृषी उत्पन्न बाजार समिती. आणि खाजगी उद्योजक पात्र ठरणार आहेत.
या योजनेअंतर्गत प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प, दुय्यम प्रक्रिया प्रकल्प, उपपदार्थांवरील प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये पॅक हाऊस, शीतगृह, वॅक्सिन युनिट असेल. तसेच या ठिकाणी तयार होणाऱ्या उपपदार्थांवर प्रक्रिया करण्याच्या सुविधा उभारण्यात येतील.
या योजनेसाठी देण्यात येणारे अर्थसाह्य अनुदान स्वरूपात असेल. लाभार्थ्यांचा स्वनिधी १५ टक्के आवश्यक असेल. आवश्यकतेनुसार उर्वरित ८५ टक्के बँकेकडून कर्ज स्वरूपात मंजूर करुन घ्यावे लागणार आहे.
अमरावतीतील मोर्शीत तीन आणि बुलडाण्यात २ तर नागपूर, काटोल, कळमेश्वरसाठी प्रत्येक १ अशी एकूण आठ केंद्रे या योजनेतून उभारण्यात येणार आहेत.तसेच प्रत्येकी एक उपपदार्थ प्रक्रिया प्रकल्प पाचही ठिकाणी उभारणार आहे.
.