Assam tea : ऐकावे ते नवलच ! आसामच्या शेतकऱ्यांनी विकला इतका कोटी किलो चहा…

आसाम आणि चहाचे देशातच नव्हे, परदेशातही अतूट नाते आहे. अशातच या शेतकऱ्यांनी यंदा चहा विक्रीचा नवा विक्रम केला आहे. तो विक्रम काय हे ते जाणून घेऊ!

आसाममधील गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्राने (GTAC) चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे 17 कोटी किलो चहा विकला गेला असून, यामधून सुमारे 3,851 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक असून चहा दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.

यावर्षी चहा विक्रीचा सरासरी दर ₹227.70 प्रति किलो इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, हुक्होमल नावाच्या चहाच्या दोन लॉट्सना तब्बल ₹723 प्रति किलो असा उच्चांकी दर मिळाला. हा दर गेल्या अनेक वर्षांतील सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर लहान उत्पादकांच्या चहालाही ₹436 प्रति किलोचा चांगला दर मिळाल्याचे नोंदवले गेले.

गुवाहाटी चहा लिलाव केंद्र हे देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या चहा व्यापार केंद्रांपैकी एक आहे. येथे होणाऱ्या लिलावांमध्ये देशभरातील आणि परदेशातील खरेदीदार भाग घेतात. चहा दर्जामध्ये सातत्याने होणाऱ्या सुधारणा, पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि खरी मागणी यामुळेच यंदा विक्री आणि दर या दोन्हीत वाढ झाली आहे.

चहा हे आसाममधील प्रमुख उत्पादन असून लाखो शेतकरी, कामगार आणि उद्योग यावर अवलंबून आहेत. मागील काही वर्षांत चहा दर कमी झाल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने अनेक लहान उत्पादक आर्थिक अडचणीत आले होते. मात्र यंदाच्या सुरुवातीपासून मिळणाऱ्या चांगल्या दरांमुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

चहा उद्योगातील या सकारात्मक घडामोडींमुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि नव्या गुंतवणुकीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 2024-25 हे आर्थिक वर्ष असममधील चहा उद्योगासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.03:23 PM