Highly contagious smallpox : शेळ्या-मेंढ्यांमधील देवी-हा पॉक्स विषाणूपासून शेळ्या-मेंढ्यांना होणारा अतीसंसर्गजन्य साथीचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव जानेवारी-एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर आढळतो. आजारामध्ये जनावरांच्या शरीरावर (कान, तोंड, कास, सड, शेपटीखाली, पोट इत्यादी) प्रथम लालसर पुरळ येते. त्यामध्ये पू होऊन ते पिवळ्या रंगाचे दिसतात. त्याचे रूपांतर खपल्यामध्ये होते. आजारामध्ये प्रौढ शेळ्या-मेंढ्यांमध्ये ५ ते १० % मरतुकीचे प्रमाण असून करडे, कोकरांमध्ये हे प्रमाण जास्त असते.
*प्रतिबंध असा करावा:*
मेंढ्यांकरिता शीप पॉक्स व शेळयांकरिता गोट पॉक्स लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. लसीची रोगप्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत जनावरांच्या शरीरामध्ये राहते. याकरिता तीन महिन्यांवरील सर्व शेळ्या, मेंढ्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यात दरवर्षी न चुकता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.
दोन टक्के फेनॉल किंवा एक टक्का फॉर्मेलिनच्या द्रावणाने जनावरांचे वाडे व इतर साहित्य निर्जंतुक करून घ्यावे. तसेच फ्लेम गनच्या साह्याने वाडे वरच्यावर निर्जंतुक करावेत.
बाधित शेळ्या-मेंढ्यांच्या संपर्कात आलेला चारा, खाद्य तसेच मृत जनावरे जमिनीमध्ये पुरून किंवा जाळून विल्हेवाट लावावी. बाधित कळप किंवा शेळ्या-मेंढ्यांना किमान दीड महिना वेगळे ठेवावे.
नवीन खरेदी केलेल्या शेळ्या-मेंढ्या किमान तीन आठवडे मूळ कळपामध्ये मिसळू नयेत. प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये मेंढ्यांचे स्थलांतर करू नये.
*उपचार असे करा:*
लक्षणे आढळून आल्यास प्रथम आजारी जनावर कळपातून वेगळे करावे. आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. इतर जीवणूंचे संक्रमण टाळण्याकरिता पाच दिवस प्रतिजैविके व वेदनाशामक औषधोपचार करावा. शरीरावरील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ व निर्जंतुक करून त्यावर जंतुनाशक मलम लावावे.












