
Big employment opportunity : राज्यात मोठ्या शहरांसह निमशहरी भागातही आता दुचाकी टॅक्सी सेवा सुरू होणार असून, त्यामुळे प्रवास सुलभ होण्यासोबतच नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या धोरणास मान्यता देण्यात आली असून, किमान एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे.
वाहनसंख्येवरील ताण कमी करण्यासाठी शासनाने दुचाकी पुलिंगलाही मान्यता दिली आहे. म्हणजेच लिफ्ट देऊनही पैसे कमावता येणार आहे. बाईक टॅक्सी वाहतुकीसाठी वाहने मोटार वाहन कायद्यांतर्गत आवश्यक परवाने, विमा आणि योग्यता प्रमाणपत्रासह नोंदणी करावी लागेल. तसेच, प्रवासी भाडे हे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे ठरवले जाणार आहे.
ही सेवा केवळ इलेक्ट्रिक दुचाकींना लागू असणार असून, त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे, निमशहरी भागात सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांची कमतरता असल्याने या सेवेमुळे तेथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय, या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. २० ते ५० वर्षे वयोगटातील चालकांना ही सेवा देण्याची परवानगी असून, महिला प्रवाशांसाठी महिला चालक निवडण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.
बाईक टॅक्सी सेवेमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना जलद आणि स्वस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच, निमशहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठीही ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ सुधारण्यास ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. नव्या धोरणामुळे राज्यात परिवहन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.