Kolhapuri Dams : आता कोल्हापुरी बंधाऱ्यांचे होणार बॅरेजमध्ये रूपांतर, शेतीसाठी मोठा लाभ…

Kolhapuri Dams : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना अधिक स्थिर पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यानुसार बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब, टाकळगाव हिंगणी आणि निमगाव या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अनुक्रमे १७.३० कोटी, १९.६६ कोटी आणि २२.०८ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

हे बंधारे गेल्या तीन ते चार दशकांपूर्वी बांधले गेले होते, मात्र त्यांची स्थिती खालावली होती. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे पूरस्थिती हाताळताना अडचणी येत होत्या. त्यामुळे या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून पूरनियंत्रण अधिक प्रभावी करणे आणि सिंचनासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध करणे हा शासनाचा उद्देश आहे.

या निर्णयामुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः बीडसारख्या तुलनेने कमी पावसाच्या भागात या सुधारित जलसंधारण प्रकल्पांमुळे शेती अधिक फलद्रूप होईल. याशिवाय, पाण्याचा ताण कमी होऊन शेतीसाठी आवश्यक जलसाठा दीर्घकाळ टिकून राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील शेती आणि जलसंधारणाच्या दृष्टीने या निर्णयाचे महत्त्व लक्षात घेता, भविष्यात अशा अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल, अशी शक्यता आहे. शासनाच्या या पावलामुळे शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि जलसुरक्षित शेती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply