
Performance of Women FPOs : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांना यश येत आहे, उमेद अभियानांतर्गत स्थापित शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांना किंवा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे संमेलन सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे झाले.
महाराष्ट्रात सध्या ४५० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) सक्रिय आहेत. आतापर्यंत ५ लाख स्वयं सहाय्यता समूहांना जवळपास १,००० कोटींचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बँकांमार्फत ग्रामीण महिलांना ३०,००० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात १९ लाख लखपती दीदी अभियानाने तयार केल्या आहेत.
महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये उत्पादक कंपन्या करोडपती
राज्यभरात उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य वा थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य नफा मिळावा ह्या उद्देशाने एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला विविध कंपनीचे २५ खरेदीदार व ७० महिला शेतकरी उत्पादक यांनी सहभाग नोंदवला. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाची खरेदी विक्री करावी हा प्रमुख उद्देश होता.
यामध्ये प्रामुख्याने तूर डाळ, चना डाळ, उडीद डाळ, नाचणी, कांदा, तांदूळ , मिरची, हळद यासारखे ३५ उत्पादनाचा समावेश करण्यात आला. या संमेलनात खरेदी-विक्री मधून दिवसभरात एकूण १.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
या संमेलनात झालेल्या वेगवेगळ्या करारांमधून आणि बोलणीतून भविष्यामध्ये ७ ते ८ कोटीची उलाढाल होणे अपेक्षित आहे.