Sugarcane,turmeric crop : पावसाचा अंदाज पाहून ऊस व हळद पिकांची घ्या काळजी..

Sugarcane and turmeric crop : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेतर्गत तज्ज्ञ समितीने ऊस आणि हळद पिकांसाठी हवामान आधारीत सल्ला दिला आहे. ६ मेपासून पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऊसासाठी कृषीसल्ला:
ऊस पिक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. यामध्ये तणांचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे तण नियंत्रणासाठी वेळेवर खुरपणी करावी. गरजेनुसार पाणी द्यावे, मात्र पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन करावे. खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस २०% हे औषध २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% हे ४ मिली प्रमाणात १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मात्र, ही फवारणी पावसाची उघडीप बघूनच करावी, असे सांगण्यात आले आहे.

तसेच, ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३०% हे कीटकनाशक ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हवामान अनुकूल असल्यासच कीटकनाशकांची फवारणी करावी, अन्यथा त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही.

हळद पिकासाठी कृषी सल्ला
दरम्यान, सध्या अनेक भागात हळदीची काढणी, उकडणे व वाळवणीची कामे सुरू आहेत. परंतु, पावसाची शक्यता असल्यामुळे हळद उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवावी. ओलाव्यामुळे साठवणीत बुरशी व कुज येण्याचा धोका असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य सल्ला अमलात आणून आपली पिके सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.