
Fruit Advice : सध्या महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढलेला असून कमाल तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत फळबागांना विशेषत: आंबा, संत्रा, मोसंबी, केळी व चिकू झाडांना पाण्याचा ताण, फळगळ आणि उन्हाचा धोका संभवतो. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान आधारीत कृषी सल्ला योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.
संत्रा व मोसंबीच्या अंबे बहार फळबागांमध्ये सध्या फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी झाडांना सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे पाणी द्यावे. फळगळ रोखण्यासाठी ००.५२.३४ हे खत १.५ किलो आणि जिब्रॅलिक ॲसिड १ ग्रॅम प्रमाणात १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मात्र ही फवारणी पावसाची उघड बघूनच करावी.
केळी बागांमध्ये घड लागलेल्या झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेले घड त्वरित तोडावेत. केळीच्या रोपांना सरीवरंबा पद्धतीने पाणी द्यावे आणि आळ्याभोवती आच्छादन करावे, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील. लहान झाडांना उन्हापासून वाचवण्यासाठी सावली द्यावी.
आंबा बागांमध्ये पाण्याचा ताण बसल्यामुळे फळगळ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वेळेवर पाणी द्यावे. जमिनीतील तापमान संतुलित राहण्यासाठी आळ्याभोवती आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी सावली करणे आवश्यक आहे. पिकलेली आंबा फळे उशीर न करता काढून घ्यावीत.
चिकू बागांमध्येही गरजेनुसार पाणी द्यावे. लहान झाडांना काठीने आधार द्यावा. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर लहान झाडांच्या खोडाभोवती आच्छादन करावे व झाडांना सावली द्यावी.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फळबागांचे नुकसान होऊ नये, यासाठी या सल्ल्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.