
Mango Mohara : यावर्षी काळजी घेतलेल्या तसेच कल्टार दिलेल्या बागेत अत्यंत चांगला मोहर आला आहे, मात्र थोडा लवकर आणि काही उशिरा असा दोन तीन टप्प्यात आहे. या मोहोराची आता चांगली काळजी घेतल्यास यावर्षी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल असा विश्वास फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केला आहे. मोहोर संरक्षणासाठी त्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत.
मोहोराचे संरक्षण असे करा
काही भागातील बागामध्ये चांगल्यापैकी मोहर आलेला आहे व तो आता उमलण्याच्या स्थितीत आहे. म्हणजेच पोलिनेशनच्या परिस्थितीत आहे. अशावेळी मोहरावर तुडतुडे आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी तुडतुडे नियंत्रणासाठी आता फारशी कीटकनाशक वापरू नयेत. कारण त्यामुळे मधमाशाना त्रास होतो या मधमाश्या पॉलिनेशन साठी खास मदत करतात.
तेव्हा फक्त भुरी नियंत्रणासाठीच भुरीनाशक म्हणजे 80 टक्के पाणी मिश्रित गंधक २५ ग्राम किंवा साप १५ ग्राम प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी घ्यावी आणि फळ सेटिंग झाल्यानंतर मात्र कीटकनाशक तसेच रोग नाशक दोघांचीही वेळापत्रकाप्रमाणे फवारणी घ्यावी.
त्याचबरोबर फळे बाजरीच्या आकाराची झाली असताना. या फवारणी व्यतिरिक्तही 50 पीपीएम जि. एक . ची एक किंवा जमल्यास दोन फवारण्या घेणेअत्यंत गरजेचे आहे.
अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी बागेस पाणी देणे सुरू केले नाही तेव्हा आता हळूहळू सर्वत्र शेतकऱ्यांनी आपल्या बागेत पाणी देणे सुरू करावे.