
मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यामध्ये आजपासुन पुढील आठवड्यामध्ये म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (गडगडाटीसह वीजा, वारा, गारा व धारा सह) पावसाची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यामध्ये रविवारी १२ मे पासून पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार १६ मे पर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपीट ही होण्याची शक्यता आहे . पुढील पाच दिवसामध्ये विशेषतः कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, लातूर ह्या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता जास्त जाणवत आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार १६ मे पर्यंत तेथे सरासरी ३५ व २५ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे कमाल व किमान तापमान राहणार आहे तेथे दमटयुक्त उष्णता, उष्णतेची लाट, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस इत्यादी सारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नाही केवळ स्वच्छ उन्हाळी वातावरण जाणवेल, असे वाटते.
महाराष्ट्रामधील चौथ्या व पाचव्या लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही.२९ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण व काहीशा वारा वहनातून दुपारी ३ चे कमाल तापमान ४० ते ४३ डिग्री से. ग्रेड दरम्यान म्हणजे सरासरी इतके किंवा थोडेसे एक ते दोन डिग्री से. ग्रेडने जास्त असेल . त्यामुळे उन्हाचा जास्त चटका जाणवणार नाही. तसेच सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान उरकल्यास त्यांना अवकाळी वातावरणाचा कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नाही, असे वाटते.