रासायनिक खते औषधे यांचे गगनाला भिडणारे दर, निसर्गाचा लहरीपणा,वाढता उत्पादन खर्च, त्या तुलनेमध्ये उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारा भाव यामुळे आज शेतीला चांगले दिवस नाहीत , परंतु नाशिकच्या शिरवाडे येथील पाच शेतकऱ्यांनी खर्चात बचत करत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल तसेच सामूहिक शेतीचा प्रयोग करून पिकवलेली मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना करण्यात आली आहे .
प्रतिकूल परिस्थितीवरही माणूस प्रचंड इच्छाशक्ती असली की चांगल्या पद्धतीने मात करू शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणजे निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील रमेश शेळके, अनिल आवारे, विजय आवारे, प्रमोद आवारे,भूषण आवारे हे प्रयोगशील शेतकरी आहेत . रमेश केदु शेळके व सुरेश केदु शेळके यांनी टोमॅटो, मिरची व द्राक्षे पीक हे अत्यंत क्षारपड जमिनीत उत्तम प्रकारे घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. शेळके बंधू यांची जमीन क्षारपड. जमिनीचा सामू ११ च्या वर तसाच पाण्याचाही सामू १० च्या वर, पाणीही अत्यंत खराब.त्यामुळे त्या जमिनीत कोणत्याही पिकाची वाढ होत नसे. या जमिनीत केवळ जनावरांचा चारा व गहू हेच पीक घेता येत होते .शेळके बंधूनी यावर अनेक कृषी तज्ञांचे मत घेतले.
महागडी रासायनिक औषधे,खते यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला . मात्र, शेती उत्पादनामध्ये फारसा फरक पडला नाही. उत्पादन कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती झाल्यामुळे शेळके बंधूंची आर्थिक परिस्थिती बिकाटीची झाली . त्यामुळे शेळके बंधू हतबल झाले होते.आर्थिक स्थिती आता नगदी पिकाशिवाय सुधारणार नाही हे त्यांनी ओळखले आणि या परिस्थितीवर मात करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी सगळ्यात अगोदर गोड पाण्याची सोय केली ते एक तळ्यात साठवले, त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला परंतु जमिनीचा सामू जास्त होता.त्यामुळे पिकाला पाणी दिल्या नंतर जमिनीवर पांढरा थर निर्माण होत होता .
विषमुक्त मिर्चीतुन चांगलं उत्पादन..
धामोरी येथील सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीत सेंद्रिय पद्धतीचा प्रयोग करून मिरची लागवड केली. शेणखत टाकून त्यावर खतांचा मूळ डोस म्हणून रासायनिक खते न वापरता गांडूळ खत व इतर सेंद्रिय खते वापरली . ठिबक सिंचनच्या सहाय्याने सिंचन व्यवस्था करून कमीत कमी पाण्याचा वापर करून ते फक्त मुळाशी कसे राहील, याची व्यवस्था केली. त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन करण्यात आले . जिवामृताची फवारणी केली. त्यामुळे पीक बहरून आले. पीक वाढीसाठी वेळोवेळी गांडुळ खताचा वापर केला, रासायनिक खतांचा वापर टाळला . त्यामुळे मुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली. शेतीतील या बदलामुळे त्यांना चांगली आर्थिक आवक झाली.
गांडुळांची भूमिका हि निसर्गाच्या अमूल्य अन्नपद्धतीत महत्त्वाची होती. जमिनीत गांडुळे जास्त महत्त्वाची असतात. जमिनीत रासायनिक खतांमुळे उष्णता निर्माण झाल्यामुळे, गांडुळे खाली आणि खाली सरकतात,मल्टिप्लायर जमिनीत असे वातावरण निर्माण करते त्यामुळे दुसऱ्या वर्षी गांडुळे वर येऊन खत बनवायला सुरुवात करतात. दरवर्षी वर्षभर लागवड केलेल्या एक एकर जमिनीत १२० टन गांडुळ खत बनते. त्यामुळे एक रुपयाचे सुद्धा बाहेरून खत टाकण्याची आवश्यकता पडत नाही .
– सुनील शिंदे, सेंद्रिय शेती मार्गदर्शक