
Rabi crops : वातावरणातील सध्याचा हा बदल हवेत गारवा वाढून, सध्याच्या रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिवाय ढगाळ व दमट वातावरणाची शक्यता दुरावल्यामुळे आता मागास लागवड झालेल्या रब्बी पिकांवर बुरशी, मावा, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही.
तसेच किरकोळ पावसाबरोबर ४ व ५ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी नुकसानदेही गारपीटीची भीतीही गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याची वातावरणीय अवस्था ही रब्बी पिकासाठी नक्कीच लाभदायीच समजावी असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण व पुणे, सातारा अशा ९ जिल्ह्यात ही शक्यता अधिकच दाट आहे. त्यामुळे थंडी साधारणच राहून एखाद- दुसऱ्या थंडीच्या लाटेतून महाराष्ट्रात थंडी मिळू शकते.
खान्देश, छ.सं.नगर जालना सोलापूर असे ६ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता अधिक आहे. वर उ्ल्लेख केलेल्या ६ जिल्ह्यात मात्र हेच किमान तापमान सरासरी इतके जाणवेल.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाणवणारं ‘ कळंघण ‘ किंवा सुटणारं थंड वाऱ्याचं ‘ वरळ ‘ह्या वर्षीच्या ‘ ला-निनाच्या २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात ही जाणवण्याची शक्यता आहे. भले मानवी जीवनाला काहीसे बाधक ठरत असले तरी दाणा भरणीच्या रब्बी पिकांना फायदेशीर ठरते.
कोकण –
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १८ ते २१ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान आहे. दोन्हीही तापमाने काहीसे सरासरीच्या खाली घसरले असल्यामुळे मुंबईसह कोकणातील वातावरण आल्हाददायक जाणवत आहे. हे वातावरण पुढील १० दिवस अपेक्षित आहे.
उर्वरित महाराष्ट्र-
उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात (सोलापूर व कोल्हापूर १९ डिग्री वगळता) पहाटेचे किमान तापमान १५ ते १८ तर कमाल तापमान ( महाबळेश्वर २९. ५ डिग्री वगळता) ३२ ते ३५ डिग्री से.ग्रेड दरम्यान आहे. भागपरत्वे किमान तापमान(जळगांव ५.६, पुणे, सं.नगर व वर्धा ४वगळता) सरासरीपेक्षा २ ते ३ तर कमाल तापमान(अमरावती, ब्रम्हपुरी, बुलढाणा – ५ वगळता) सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने अधिक आहे.त्यामुळे ह्या २९ जिल्ह्यात दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. अर्थात ही दैनिक तापमाने असल्यामुळे भागपरत्वे थोडी फार खाली वर होत असतात. पुढील १० दिवस ही तापमाने अजुन घसरण्याची शक्यताही हवामानतज्ज्ञ श्री. खुळे यांनी वर्तविली आहे.