*Maharshtra weather : राज्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि धुके पसरलेले होते. नंतरच्या काळात त्यात बदल झाले आणि सूर्यनारायणाचे दर्शन होऊ लागल्याने द्राक्ष, फळबागांचे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, असे असले, तरी आगामी काळात पुन्हा थंडी परतू लागणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे तर पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ राहून त्यानंतर दोन दिवस अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील उत्तर भागात दिनांक 06 व 07 जानेवारी रोजी धुके राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दोन दिवसानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) दिनांक 03 ते 09 जानेवारी 2025 दरम्यान पावसाची शक्यता नाही, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 10 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान पावसाची शक्यता नाही, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान दिनांक २ जानेवारीपर्यंत असलेल्या ऊबदार वातावरणात बदल होवून, पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार दि. ९ जानेवारी पर्यंत किमान तापमानात काहीशी घट होवून संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू मध्यम थंडी जाणवेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
दिनांक १० ते १६ जानेवारी दरम्यानच्या दुसऱ्या आठवड्यातही खान्देश नाशिक नगर पुणे सातारा तसेच रत्नागिरी छ.सं.नगर ९ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव तसाच टिकून राहून पहाटेचे किमान तापमान हे सरासरीच्या खाली जाणवेल, त्यातही उत्तर विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र वर उल्लेख केलेल्या नऊ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतकेच म्हणजे १२ ते १४ डिग्री से. ग्रेड इतके जाणवण्याची शक्यता आहे, असे वाटते.
पुढील १५ दिवस म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यन्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.
त्यानंतर मात्र थंडी वा पावसाची स्थिती ही मात्र एमजेओच्या तीव्रतेवरच अवलंबून असेल, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.