*sugar crushing: आमच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यापैकी अनेकांचा ऊस गाळपासाठी गेला, असणार तर अनेकांना आता ऊसाच्या एफआरपीची रक्कमेची प्रतीक्षा असणार आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की सध्या गाळप हंगाम जोरावर सुरू आहे. प्रत्येकालाच आता साखरेचा उतारा किती निघाला आणि आपल्याला किती फायदा होणार याची उत्सुकता आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती इथे सांगणार आहोत.
कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पण यंदाच्या साखर हंगामात काही संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम देशभरात दिसू शकतो. ते संकेत म्हणजे यंदा साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने 31 डिसेंबर 2024 पर्यंत साखर उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 2024-25 हंगामाच्या पहिल्या तिमाहीत साखरेचे उत्पादन 95.40 लाख टनांवर पोहोचले आहे. शेतकरी बांधवांनो हे उत्पादन मागच्या वर्षी ११३.०१ लाख टन होते. म्हणजेच साखर घटली आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा झाला, तर सध्या राज्यातील साखर उत्पादनातही घट झाली आहे. याचे कारण म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २१ कारखाने यंदा बंद आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे डिसेंबरमध्ये ८ लाख टनांनी हे उत्पादन घटले आहे. मागच्या वर्षी साखर उत्पादन ३८ लाख टन होते, यंदा याच काळात त्यात घट झाली असून ते अवघे ३० लाख टन इतके झाले आहे.
तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश हे ऊस उत्पादनात आणि साखर गाळपात आघाडीचे राज्य आहेत. त्यातही आपल्या महाराष्ट्राचा देशात साखर गाळपात दुसरा क्रमांक लागतो. या क्षेत्रातील जाणकार सांगतात की यंदा साखरेचे उत्पादन संपूर्ण देशभरात घटू शकते आणि ते चक्क २८० लाख टनांवर घसरेल, त्याचा परिणाम साखरेचे भाव वाढण्यात होऊ शकतात.
यंदा निवडणुकीमुळे राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरू झाला, त्याचाही परिणाम उत्पादन घटण्यावर झाला आहे. मात्र तरीही एकूण अंदाज हा कमी साखरेचाच असणार आहे असे दिसते. यंदा इथेनॉलसाठी मागच्या पेक्षा जास्त म्हणजेच सुमारे दुप्पट साखर ४० लाख टन वापरली जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळेही साखरेच्या किंमती वाढू शकतात.
अर्थात या सगळ्याचा सध्या तरी ऊसाच्या पहिल्या हप्ता मिळण्यात शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही. मात्र नंतर कदाचित टंचाई निर्माण होऊन भाव वाढले, तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांनाही मिळू शकतो.