Soybean purchase : सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत ६ फेब्रुवारीला संपली, मात्र सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न कायम असून अनेकांचे सोयाबीन हमीभाव खरेदी झालेले नाहीत. त्यातच अडचणी आल्याने पुन्हा एकदा सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटना आग्रही आहेत.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अधिकृत माहितीत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चिन्ह निर्माण झाले होते. पण महाराष्ट्र सरकारने त्यानंतर पुन्हा नवी प्रेसनोट काढून हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय म्हणणे आहे राज्याचे?
महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.
काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी देण्यात आली आहे. तथापि, ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.












