Kapus Bajarbhav : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतात यंदा म्ह्णजेच वर्ष २०२४-२५मध्ये कापसाचे उत्पादन घटले आहे. संपूर्ण देशात यंदा कापसाची हेक्टरी उत्पादकता वाढली आहे. मागील वर्षी हेक्टरी ४३५.७५ किलो कापूस उत्पादन झाले. यंदा त्यात काहीशी वाढ होऊन हेक्टरी ४४७.८४ किलो सरासरी कापूस उत्पादन देशात झाले आहे.
कापूस हंगाम 2024-25 साठी कापूस उत्पादन आणि वापर समितीची (सीओसीपीसी) पहिली बैठक काल – दि. 28.11.2024 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्र आयुक्त रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, संचालक सौरभ कुलकर्णी उपस्थित होते. तसेच या बैठकीला केंद्र सरकार, राज्य सरकार, वस्त्रोद्योग, कापूस व्यापार आणि जिनिंग आणि प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी कापसाचे राज्यनिहाय क्षेत्र, उत्पादन, आयात, निर्यात आणि वापर समाविष्ट असलेल्या कापूस परिस्थितीवर चर्चा केली. कापूस हंगाम 2023-24 साठी कापूस उत्पादन आणि वापर समितीने काढलेले राज्यनिहाय क्षेत्र, कापूस उत्पादन आणि ताळेबंद 2024-25 सादर करण्यात आले.
राज्याचे कापूस चित्र
महाराष्ट्राचा विचार करता राज्याची कापूस उत्पादकता यंदा ३५२.९९ किलो प्रति हेक्टर आहे. मागच्या वर्षी हीच उत्पादकता कमी म्हणजेच ३२३. ०२ किलो प्रति हेक्टर होती. मागच्या वर्षी राज्यात ४२.३४ हेक्टरवर कापूस लागवड होऊन एकूण ८०. ४५ लाख गाठींचे उत्पादन झाले, तर यंदा ८४.८० लाख गाठींचचे (एक गाठ= १७० किलो) उत्पादन झाले.
देशातील उत्पादन
असे असले तरी देशात यंदा कमी झालेली लागवड आणि काही ठिकाणी घटलेले उत्पादन यामुळे देशपातळीवरील कापूस उत्पादन घटले आहे. मागच्या वर्षी ३२५. २२ लाख गाठींचे उत्पादन झाले, तर यंदा केवळ २९९.२६ लाख गाठींचे उत्पादन झाले.
असे असले तरी कापसाच्या किंमतीत फार वाढ होणार नसल्याचे चित्र असून निर्यातीसह देशांतर्गत कापसाची आवश्यकता यंदा १० लाख गाठींनी कमी आहे. त्यामुळे देशात सध्या तरी कापसाचे भाव ७.५ ते ८.५ हजार प्रति क्विंटल राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र निर्यातीसह परिस्थिती बदलल्यास कापसाच्या किंमती वाढू शकतील असेही जाणकार सांगत आहेत.03:23 PM