आज पहाटेच्या दरम्यान नाशिकच्या द्राक्षपट्यात सुमारे दोन तासांहून अधिक पाऊस झाल्याने द्राक्षबागांना त्याचा फटका बसला आहे.
निफाड तालुक्यातील उगाव, रानवड, निफाड, वनसगाव, शिवडी यासह परिसरातील गावांमध्ये दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात होऊन सुमारे दोन ते अडीच तास पाऊस सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसाने परिसरातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.
नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.
या आठवड्यात थंडीचा कडाका आणि धुके वाढल्यावर द्राक्ष उत्पादकांचा फवारणीसाठीचा खर्च आणि मेहनतही वाढली होती. अनेकांनी द्राक्षबागा वाचविण्यासाठी फवारणीसह विविध उपाय करायला सुरूवात केली होती. मात्र एक संकट समोर असतानाच पावसाच्या रुपाने दुसरे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान आज नाशिक शहरातही सकाळी हलका पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील द्राक्षबागांसह काही पिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.