Eknath Shinde : आपत्ती व्यवस्थापन समितीवरून डावल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य सरकारने केलेल्या नियम बदलामुळे संपलेले अलिकडेच संपल्याचे दिसत असले, तरी महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सलगी वाढली असल्याचे विविध कार्यक्रमांमधून दिसून येत आहे.
शिंदे यांना काय सुचवायचे आहे?
नुकताच नवी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांची भरभरून स्तुती केली. आम्ही कायम संपर्कात असतो आणि पवारसाहेब मला मार्गदर्शनही करत असतात, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी टिका केली. दरम्यान एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्याशी जवळीक साधून महायुतीला काही इशारा देऊ इच्छितात का? या अर्थाचा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. यापूर्वीही त्यांनी बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळेही राजकीय चर्चांना उधाण आले असून शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय, ते सरकारवर नाराज आहेत का? किंवा काही वेगळा विचार करणार आहेत? अशा चर्चा झडताना दिसत आहे. दरम्यान योग्य जुळवाजुळव झाली, तर शिंदे दुसरे बंड करू शकतात असाही होरा राजकीय वर्तुळातून सांगितला जात आहे.












