![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/निर्यातबंदी-असतानाही-देशातून-परदेशांत-jpg.webp)
निर्यातबंदी असल्यामुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. अशा अडचणीच्या स्थितीतही बांग्लादेश ,मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, व आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे. ही तस्करी शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे. शेतकरी आणि ग्राहक हिताच्या केंद्र सरकार वारंवार गोष्टी सांगत असतात,परंतु आता कुणाकडून कांद्याची तस्करी होत आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने निर्यातबंदी केली होती . परंतु निर्यातबंदी असतानाही नाशिक जिल्ह्यातून कांद्याची तस्करी होत आहे. दबक्या आवाजात याबाबत गेल्या १५ दिवसांपासून चर्चा होती. वेग्वेगळ्या मार्गाने लपवून कांदा परदेशात पाठविला जात आहे.
काही केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने सीमा भागातून कांदा पुढे श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ व मलेशियात जात आहे. या अगोदर निर्यातदार १५ ते २० हजार रुपयांपर्यंत नफा मिळवीत होते. परंतु या तस्करी मधून तस्कर मालामाल होत आहेत.त्यांना १० ते १५ लाखांपर्यंतचा परतावा मिळत आहे.
हे कामकाज प्रामुख्याने पिंपळगाव बसवंत, लासलगाव, मुंगसे (मालेगाव) व उमराणे या ठिकाणीहोत असल्याचे सूत्रांनी सांगितले.काही जण शेतकऱ्याला मातीत घालून मालामाल होत आहेत,यामागे नेमका हात कोणाचा आहे, यामध्ये केंद्र सरकारच्या काही यंत्रणांचे पाठबळ आहे का, असे सवाल विचारत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
अशी होते आहे कांद्याची तस्करी :
– बारदाना व प्लॅस्टिक गोण्यांमधून एरवी कांदा निर्यात होत असते . परंतु आता कांदा व्यापारी खळे तसेच पॅकहाउसमधून संत्रा, लिंबू ,डाळिंब, द्राक्ष,व हिरव्या मिरचीच्या या पेटाऱ्यांत कांदा भरतात.
– त्यानंतर या पेटाऱ्याना रेफर कंटेनर लोड होत असताना मध्यभागी ठेवले जाते . दर्शनी व तपासणीच्या भागात नाशिवंत शेतीमाल व फळे ठेवली जातात.
– कडधान्यांच्या पोत्यातून कांद्याची तस्करी श्रीलंकेत होत आहे.
– कांद्याची दररोज १५०० ते २००० टन तस्करीहोत आहे ,व त्यातून १५ ते २० कोटींची दररोज कमाई होते.
परदेशात कांद्याचा तुटवडा..
भारतामध्ये कांद्याला घाऊक बाजारात सरासरी १० रुपये प्रतिकिलोच्या आसपास दर मिळत आहे. परंतु शेजारच्या देशात कांदाचा तुटवड्या असल्यामुळे किमती वाढल्या आहेत. श्रीलंकेत आयात झालेल्या कांद्याला .‘सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका’ यांच्या अहवालानुसार भारतीय चलनाप्रमाणे १०० रुपये प्रतिकिलोवर दर मिळत आहे. तर ‘सोब्जी बाजार’ या बांगलादेशातील संकेतस्थळावरील माहितीनुसार घाऊक बाजारात प्रतिकिलोला ६५ रुपयांवर दर आहे, तर किरकोळ बाजारामध्ये १०० रुपये दर आहेत.
मलेशियामध्ये ७५ रु किलो दर घाऊक बाजारात मिळत आहे तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलो दर मिळत आहे . नेपाळमध्ये प्रतिकिलोला ६७ रुपये दर आहेत. त्यामुळे ५ ते १० पट पैसे तस्करीतून कमावले जात आहेत. सीमेवरील अधिकाऱ्यांना देखील एक कंटेनर परदेशात सोडण्यासाठी जवळपास दीड लाखापासून ते अडीच लाखापर्यंत पैसे दिले जातात.
भारतातील कांदा भारत व बांगलादेश सीमेवरील घोजाडांगा (पश्चिम बंगाल) भागातून बांगलादेशमध्ये जात आहे . यापुढे कांदा मलेशियात जातो. तसेच पुढे जेएनपीटी(मुंबई) बंदरातून आखाती देशांमध्ये जातो. तसेच तुतिकोरीन (चेन्नई) येथील बंदरातून कांदा श्रीलंकेत जात आहे .
शेतकऱ्याला अडचणीत आणून काही विशिष्ट घटकांना मालामाल करण्याचा हा प्रकार आहे.कांदा निर्यात केंद्र सरकार खुली करू शकत नाही, तस्करी थांबवू शकत नाही. त्यामुळे हे केंद्र सरकारचे अपयश आहे. सर्रास हा प्रकार होत आहे. सीमेवरील अधिकाऱ्यांना देखील एक कंटेनर परदेशात सोडण्यासाठी जवळपास दीड लाखापासून ते अडीच लाखापर्यंत पैसे दिले जात असल्याची चर्चा आहे. यामध्ये कोण सहभागी आहे हे शोधले पाहिजे. होत नसेल तर कांदा उत्पादकांना क्विंटलमागे ३ हजार रुपये तोटा झाला, तो द्या.
– भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना