Devendra Fadnavis Maharashtra CM : मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसमोर असणार ही आव्हाने..

Devendra Fadnavis Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता अखेर काल दिनांक ४ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. मुख्यमंत्रीपदावर दावा केलेल्या भारतीय जनता पार्टीने आपल्या गटनेतेपदी अखेर देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती केली आहे. त्यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या मंत्रीमंडळ शपथविधीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे नक्की झाले आहे.

दरम्यान काल सायंकाळी खेळीमेळीत झालेल्या पत्रकार परिषदेत मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेणार की नाही यावर स्पष्टपणे भाष्य केलेले नाही. याशिवाय इतरही काही गोष्टींत शिंदे हे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात नाराज एकनाथ शिंदे यांचेच आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असणार आहे.

याशिवाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नही पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता असून मनोज जरांगे यांनी आंदोलन पुन्हा पुढे सुरू ठेवण्याबाबत आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी लढा देण्याबाबत बोलून दाखवले. त्यामुळे ओबीसी आणि मराठा अशा दोन्ही समाजांत रोषाची भावना निर्माण होऊन त्यांना सावरणे हे नव्या मुख्यमंत्र्यांसमोरील आव्हान असेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजारांचा भाव, लाडकी बहिण योजनेला २१०० रुपयांपर्यंत वाढ यांसह राज्यातील उद्योग आणि गुंतवणूक बाहेर राज्यात जाणे, स्मार्ट सिटी आणि अमृत योजनांतील शहरांतील सुविधा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, त्याचे आव्हान, तसेच विविध योजनांमुळे येणारा राज्यातील तिजोरीवरील ताण आणि त्यासाठी करावी लागणारी कसरत. अशीही आव्हाने मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे असतील असे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्रीपदी बहुजन चेहरा असावा अशी भाजपाच्या हाय कमांडची भूमिका होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मु्ख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे दिल्लीतील वरिष्ठांकडून एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना विरोधच असल्याची राजकीय चर्चा होती. भविष्यात याही आव्हानाचा सामना त्यांना करावा लागणार आहे.

एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ त्यातले त्यात सरळपणाने पार पडला. संपूर्णपणे ५ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहणारे ते एकमेव ठरले, मात्र या वेळेस त्यांच्यासमोर विविध आव्हाने असतील आणि त्यावर ते कशी मात करणार? यावर या सरकारचे भवितव्य ठरेल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *