
rabi maize:रब्बी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे एकात्मिक पदधतीने नियंत्रण करावे. भौतिक नियंत्रण करताना शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी, असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही.
जैविक नियंत्रण:
अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५०,००० अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत. प्रतिबंधात्मक उपाय- पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) :
रब्बी मका वरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अळीच्या वाढीच्या लवकरच्या (१ ते ३ अवस्था) अवस्थांमध्ये निमअर्क १५०० पीपीएम ५ मिली किंवा निंबोळी अर्क ५% यांची प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अथवा इमामेक्टीन बेझोएट ५% एस जी. या कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
अथवा प्रभावी नियंत्रणासाठी ५ मिली स्पिनेटोरम १९.७% एस.सी. प्रति १० लिटर पाण्यातून प्रादुर्भाव दिसून येताच १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी कळवले आहे.