halad salla: हळदीचे जोरदार उत्पादन पाहिजे? मग काढणीच्या वेळी या गोष्टी कराच

halad salla: जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये हळद पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात. तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते.

हळदीच्या काढणीअगोदर १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. एकदम पाणी देणे बंद करू नये. पाणी बंद करताना प्रथम थोडे थोडे पाणी कमी करून नंतर पाणी बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले, तर हळकुंडाना नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते.

पाला वाळल्यानंतर जमिनीच्या १ इंच वर खोड ठेवून धारदार विळ्याने हळद पिकाचा पाला कापावा. पाला बांधावर गोळा करावा. शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी करणे सुलभ होते.

हळद लागवड पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंब करावा. सरी वरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी, तर गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.

हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. त्यामुळे हळद काढणी करणे सोपे होते. खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.

दोन ते तीन दिवसांनंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात. त्या वेळी जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी सडलेली हळकुंडे या प्रमाणे कड्या मालाची प्रतवारी करावी. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.

हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. हळदीची प्रत व दर्जा चांगला राखण्यासाठी काढणी केल्यानंतर साधारणतः १५ दिवसांच्या आत प्रक्रिया करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *