onion price : दिवाळीआधी झालेल्या अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीच्या वेळी खरीप व लेट खरीप कांदा खराब निघत आहे. त्यामुळे एकरी ७० क्विंटल ऐवजी अनेक शेतकऱ्यांना एकरी २० ते ३० क्विंटल इतकेच लाल कांदय्ाचे उत्पादन निघत आहे. त्यामुळे सध्या बाजारात भाव सरासरी इतके असूनही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मागील तीन दिवसांपासून नाशिकसह राज्यातील बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. राज्याच्या कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या सरासरी अडीच ते ३ लाख क्विंटल कांदा बाजारात येत आहे. मागच्या दोन आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुपटीने कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे त्याचा बाजारभावावर परिणाम झाला आहे.
काल दिनांक ५ डिसेंबर रोजी नाशिकला लाल कांद्याची ९७ हजार, तर पोळ कांद्याची १३ हजार तर उन्हाळी कांद्याची ४ हजार क्विंटल आवक झाली. लाल कांदय्ाला सरासरी ३३७६ रुपये, पोळ कांद्याला ३७०० रुपये, तर उन्हाळी कांद्याला ४९०० रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे जास्तीत जास्त बाजारभाव सुमारे हजार ते दीड हजार रुपयाने घसरले आहेत. तर सरासरी बाजारभावात ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे.
एकीकडे बाजारभावाची ही स्थिती असताना दुसरीकडे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील चांडवड, देवळा परिसरात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा सडला आहे. चांदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याने खराब झालेल्या १० एकर कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवल्याचे वृत्त आहे. कांदा खराब झाल्याने आता कांद्याचे उत्पादन एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत घसरले आहे.