पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून ‘इअर टॅगिंग’ करणे बंधनकारक ..

१ जून २०२४ पासून पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी ‘इअर टॅगिंग’करणे बंधनकारक करण्यात आले आहे.भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची नोंद असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.तसेच ‘इअर टॅगिंग’ नसलेल्या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही देण्यात येणार नाही .

नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून कार्यान्वित करण्यात आली आहे . या प्रणालीमध्ये ‘इअर टॅगिंग’ची नोंद घेतली जाते . प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार,जन्म-मृत्यू नोंदणी , वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण , यांचा समावेश या नोंदी मध्ये करण्यात आला आहे .

सर्व पशुवैद्यकीय विभागामार्फत पशुधनाच्या कानात ‘टॅग’ लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व पशुधनाची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पशुधनातील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध करणे तसेच त्यावरती नियंत्रण करणे यासाठी मदत होणार आहे.

बाजार समितीने घ्यायची दक्षता..

आठवडा बाजार,बाजार समित्यामध्ये व गावागावातील ‘इअर टॅगिंग’ नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ‘इअर टॅगिंग’ नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाही तसेच त्यांची खरेदी-विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यायची आहे. संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहणार असल्याचे सांगितले आहे.

कधी मिळणार आर्थिक साहाय्य ..

केंद्र व राज्य शासनाकडून जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची ‘इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना देय आर्थिक साहाय्य मिळणार नाही. विजेचा धक्का,नैसर्गिक आपत्ती, तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधन जर ‘इअर टॅगिंग’ केलेले नसेल तर भरपाईची रक्कम मिळू शकणार नाही . ‘इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची वाहतूकही करता येणार नाही. तसे केले तर पशुधनाचे मालक व वाहतूकदारांवर दोघांवरही कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *