महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस उलटूनही अजून सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या ५ डिसेंबरला राज्य सरकारचा शपथविधी होणार असून त्यात देशाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार असल्याचे एक्स या सोशल मीडियावरून जाहीर केल्याने सरकार स्थापनेची तारीख जवळपास ठरली असल्याचे बोलले जात आहे.
असे असले, तरी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्हयातील दरे गावी गेल्याने चर्चांना उधाण आले होते. सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी भाजपासमोर गृहमंत्री पदाची मागणी केली आहे. मात्र भाजपा अजूनही त्यावर विचार करत असल्याचे समजते. काल रविवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आधी केलेल्या प्रमाणेच वक्तव्य केले. त्यात ते म्हणाले की सर्वसंमतीने जे होईल त्याला आपण तयार आहोत. आपण जनतेच्या मनातील कॉमन मॅन मुख्यमंत्री आहोत.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ६१ आमदारांसह केंद्रात ७ खासदारांचे बळ आहे. केंद्रातील सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यासह एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लहान पक्षांच्या पाठींब्यावर टिकून आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनासारखे पद मिळाले नाही किंवा केंद्र सरकारने ईडी किंवा अन्य काही दबाव आणला, तर एकनाथ शिंदे केंद्राचा पाठींबा काढून घेऊ शकतात. तसे झाल्यास अन्य पक्षांनाही बळ मिळून तेही सरकारचा पाठींबा काढून घेतील आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणारे भाजपा सरकार केंद्रात अडचणीत येईल.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे आगामी महापालिकांच्या निवडणुकांत, त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची साथ भाजपासाठी आवश्यक राहणार आहे. जर शिंदेंनी दुसरे बंड केले, किंवा ते नाराज झाले, तर भाजपाकडून मुंबई महापालिका उद्धव आणि शिंदे गटाच्या हातात जाऊ शकते. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्तेही साथ सोडू शकतात, अशीही कोंडीची शक्यता भाजपापुढे निर्माण झाली आहे. एकूणच या सगळ्यांमुळे सध्या भाजपा आणि महायुतीची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नक्की होणार असून मंत्रीमंडळातील संभाव्य खातेवाटपावरही चर्चा होणार असल्याचे समजते. इतकेच नाही तर भारतीय जनता पार्टी आपला विधीमंडळ पक्षाचा नेताही निवडण्याची शक्यता आहे.