farmers Subsidy and Ladki bahin yojana : शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या कृषी आणि पशुसंवर्धन संदर्भात विविध योजनांच्या सबसिडीचे पैसे निवडणुकीनंतर त्यांच्या खात्यात येण्याची प्रतिक्षा होती. मात्र विधिमंडळ अधिवेशनातील या निर्णयामुळे ही प्रतिक्षा संपली असून शेतकऱ्यांसोबतच लाडक्या बहिणींचे पैसेही आता पुढील आठवड्यात खात्यात जमा होणार आहेत.
विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी विविध योजनांच्या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्या असून सोमवारपासून विम्याचे अनुदान, विविध कृषी सबसिडी, लाडकी बहिण योजनेचा हप्ता असे सर्व पैसे संबंधित शेतकरी व महिलांच्या खात्यात येण्यास सुरूवात होऊ शकते असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
कृषी, पदुम, उद्योग, उर्जा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०२४-२५ वर्षाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजूरी देण्यात आली. त्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाकरीता राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आदी पायाभूत सुविधांचा विकास, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, लघु, मध्यम, उद्योग घटकांना, विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन योजना, दुध अनुदान योजना, केंद्र सरकारचे अनुदान असलेल्या विकास योजना, प्रकल्पांसाठी राज्याचा हिस्सा आदी खर्चासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक बांधकाम, कृषी व पदुम, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्यांचा समावेश होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7 हजार 490 कोटी 24 लाख रुपये, कृषी व पदुम विभागाच्या 2 हजार 147 कोटी 41 लाख रुपये, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 4 हजार 112 कोटी 79 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना आज मंजूरी देण्यात आली. त्यामुळे या विभागांशी संबधित योजनांचे काम आता मार्गी लागून त्यांना गती येणार आहे.