Elephant nuisance : रानटी हत्तींच्या त्रासापासून आता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार आहे. दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करण्यास सांगण्यात आले असून, हत्तींना तिलारी धरण परिसरातील संरक्षित भागात हलवण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाईक यांनी सांगितले की, हत्ती शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करत आहेत. त्यांना नैसर्गिक अधिवासात राहता यावे यासाठी तिलारी प्रकल्प परिसरात त्यांच्या उपजीविकेसाठी बांबू, केळी, फणस यांसारखी झाडे लावावीत. हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ कॉलरिंग करावी. ज्या भागात हत्तींचा वावर आहे, त्या परिसरात रेल्वे फेन्सिंगचे नियोजन करावे. हत्ती व्यवस्थापनासाठी कर्नाटक आणि पश्चिम बंगाल वन विभागाच्या तज्ज्ञांची मदत घेण्याचेही आदेश देण्यात आले.
शेती पिकांचे नुकसान भरपाई वाढवण्याचा प्रस्ताव तयार करून सादर करावा. तसेच, बांबूपिकालाही भरपाईमध्ये समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असेही नाईक यांनी सांगितले.












