![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/या-पिकामध्ये-सातत्य-ठेवत-उत्तम-नियोजनातून-आर्थिक-स्थैर्य-मिळवलेवाचा-सविस्तर-.webp)
सोलापूर जिल्ह्यातील पेनुर येथील (ता.मोगल) येथील दत्तात्रय श्रीरंग चावरे यांच्याकडे साडेपाच एकर शेती असून त्यातील अडीच एकर वहीवाटीखाली आहे. या अल्प शेतीत गेलेल्या दहा वर्षापासून मका आणि काकडी पिकात सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनुर गावामध्ये पापडी रस्त्यावर दत्तात्रय चौरे यांची शेती आहे. एकूण साडेपाच एकर शेती विभागून असून त्यातील खरिपात एक एकर काकडी,तीन एकर मका,वांगी किंवा भुईमूग अशी पिके घेतात. दोन बोअरवेल आणि एक विहीर सिंचनासाठी असली, तरी रब्बीमध्ये पाणी कमी पडत असल्यामुळे अडीच ते तीन एकर क्षेत्रावर शेतीचे फक्त नियोजन करतात.
संपूर्ण कुटुंबाचा अल्प शेतीमध्ये पिकांच्या योग्य नियोजनातून उदरनिर्वाह ते करतात. त्यांचा कल कमीत कमी पाण्यामध्ये चांगली पिके घेण्याकडे आहे. सध्या रब्बी मध्ये त्यांच्याकडे दीड एकरावर काकडी आणि १३गुंठे वांगी आहेत. शिक्षण जेमतेम असलेले, तरी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शेती करत असल्याने अनुभव चांगला आहे. दरवर्षी नका आणि काकडी पिकामध्ये सातत्य ठेवले असून, उत्तम उत्पादनासोबतच बाजाराच्या अभ्यासामुळे उत्पन्नही हमखास मिळतात. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा राजकुमार बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. विजय आणि महेश बारावीपर्यंत शिकले आहेत. विजय एका मित्राबरोबर जेसीबी व्यवसायात आहे. महेश मात्र पूर्णवेळ वडिलांबरोबर शेतीत असतो. पत्नी रंभाबाई यांच्यासोबत दत्तात्रेय चवरे यांनी मुलांना शिक्षण देत स्वावलंबी बनवले आहे.
विहीर खोदाई मजूर ते प्रगतिशील शेतकरी.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी जेमतेम शेती आणि पाण्याचाही खात्रीशीर स्रोत नाही, अशी स्थिती होती. त्याकाळी सर्वात कठीण व कष्टाच्या मानल्या जाणारा विहिरीच्या खोदाईची कामे सुरू केली. त्यातून चांगली मजुरी मिळत असे. पुढे अन्य मजुरा सोबत घेत स्वतः विहीर खोदाईचा ठेका घेऊ लागले. पेनुर, तुंगत, खंडाली, पापरी या परिसरातील सुमारे 125 हून अधिक विहिरीची खुदाई त्यांनी केली आहे.
पिकांबरोबर आर्थिक नियोजनाला महत्त्व
खरिपात पावसाच्या तोंडावर जूनमध्ये मका करायची. मका काढली की लगेच पुढे ऑक्टोबर मध्ये काकडी करायची, असा क्रम गेली कीत्येक वर्ष ठरलेला आहे.त्यांचा अनुभव या कालावधीत काकडीला मार्केट मिळतो आणि नफाही खात्रीशीर मिळतो. खरीपातील मक्याच्या उत्पन्नातील काही पैसे घरखर्चासह पुढच्या पिकांसाठी ठेवले जातात.काकडीच्या लागवडीला किती पैसे लागतील , कीडनाशके-खते किती लागतात, यासह उत्पादन सुरू होईपर्यंत किती लागतील, याचा पक्का हिशेब त्यांना तोंडपाठ आहे. त्यानुसार त्यांचे आर्थिक नियोजन केले जाते. काकडीतून पुढील हंगाम आणि घरखर्चाचा सगळा हिशेब करून आर्थिक नियोजन केले जाते.
काकडीची थेट विक्री
काकडीची सध्या रोज काढणी केली जाते. काकडीची विक्री बाजार समितीमध्ये करण्याऐवजी किरकोळ विक्रेतांना करण्यावर त्यांचा भर असतो. पंढरपूरच्या मंडईत स्वतः काकडी घेऊन जातात. तिथल्या किरकोळ विक्रेतांना काकडीची विक्री केली जात असल्यामुळे बाजार समिती पेक्षा जादा दर मिळतो. त्यासोबतच आडत, हमाली व अन्य छूपे खर्च वाचतात.मक्याची विक्री मात्र बाजार समितीत करतात.
उसनवारी नाही…
आज मुले कमावती झाली आहेत. पण घरातील सर्वांचा आर्थिक हिशेब दत्तात्रय यांच्याकडे एक हाती असतो. मुख्यत: शेतीतला पैसा शेतीत खर्च करायचा, हा त्याचा कटाक्ष असतो. घरखर्च आणि तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी मुलांचे पैसे वापरले जातात . सामान्यत: त्यातून बचत करण्याचा प्रयत्न असतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा त्यांचा स्वभावामुळे कोणाकडूनही उसनवारी करण्याची वेळ येत नाही.
चार चाकी गाडी आणि आलिशान बंगला
आयुष्यभर शेतीमध्ये कष्ट करत कुटुंबाने मुलांची शिक्षण पार पाडले. आता तिन्ही मुले हाताशी आल्याने त्यांचा भवितव्याचा विचार करून मोठ्या दुमजली घराचे बांधकाम सुरू केले आहे. येत्या पाच-सहा महिन्यांमध्ये या कुटुंबाचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.अर्धी रक्कम कर्जाऊ घेत तेरा लाखाची चारचाकी गाडीही घेतली आहे. हे सारे अल्प शेती, कष्टाचा बळावर उभे केल्याचा अभिमान त्यांना वाटतो.
कमी खर्चात चांगला नफा
गेल्या वर्षी 2023 मध्ये काकडीतून पाच लाख 50 हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. 2022 मध्ये तीन लाख 16 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर मक्यातून गेल्या वर्षी ६५ हजार रुपये आणि 2022 मध्ये ४० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. बेसल डोस, खते-कीडनाशके, फवारणी, मजुरी अशा दरवर्षी खरिपातील मका लागवडीत काढणीपर्यंत साधारण पंधरा हजार रुपये, तर पुढे मल्चिंग, काकडी लागवड, जाळी उभारणी ते काढणीपर्यंत एकरी 55 हजार रुपये खर्च येतो. योग्य नियोजनातून खर्चात बचत साधत असल्यामुळे एकूण खर्चाचा दीडपट ते दुप्पट नफा त्यांना मिळतो.
घरच्या दुधाची सोय होते
तीन म्हशी, जर्शी गाय एक, खिलार गाय एक आणि दोन शेळ्या अशी जनावरे आहेत. कणसे काढून हिरवा असतानाच मका धांडे काढून त्यांच्या मकवानाचा मुरघास करून ठेवला जातो . त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय केली जाते , घरगुती दूधदुभते भरपूर होते. त्यानंतर रोज म्हशीचे पाच लिटर दुधाचे रतीब घालतो. जर्सीचे दूध दोन्ही वेळेचे अकरा लिटर दूध डेअरीला देतात.
एकरी काकडी व मका पिकाचे उत्पादन आणि सरासरी दर:-
वर्ष—उत्पादन—सरासरी दर (प्रतिकिलो)
काकडी :-
२०२४—आतापर्यंत सहा टन (आणखी ३२ टन अपेक्षित)—३० रुपये
२०२३—२२टन—२५रुपये
२०२२—१८टन —२२रुपये
मका :-
२०२४—३० क्विंटल—अद्याप विक्री केले नाही
२०२३—२८ क्विंटल—२३०० रुपये प्रति क्विंटल
२०२२—२२ क्विंटल—१८०० रुपये प्रति क्विंटल