Tomato Rate : उन्हाळी टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य पुनर्लागवड पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. टोमॅटो पुनर्लागवडीसाठी शेतात सुरुवातीला सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करावेत. टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवडाभर आधी पाणी देऊन वाफसा स्थितीत ठेवावे. लागवडीच्या दिवशीही वाफ्यांना पाणी देऊन रोपांची पुनर्लागवड करावी.
पुनर्लागवडीसाठी निवडलेली रोपे २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सेंटीमीटर उंचीची आणि साधारण ६ ते ८ पानांची असावीत. योग्य वाढीची आणि सशक्त रोपे निवडणे आवश्यक आहे. मरगळलेली, इजा झालेली, कमकुवत मुळे असलेली किंवा रोगट रोपे पुनर्लागवडीसाठी वापरू नयेत.
पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे योग्य कीडनाशक द्रावणात बुडवावीत. इनमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ४ मिली किंवा मेटालॅक्सिल एम (३१.८ ईएस) ६ ग्रॅम अथवा काबेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिटे रोपे या द्रावणात बुडवावीत. जर रोपे ट्रेच्या माध्यमातून आणलेली असतील, तर त्यांच्यावरही या द्रावणाची आळवणी करावी.
लागवडीसाठी दोन रोपांमध्ये साधारण ३० सेंटीमीटर आणि सऱ्यांमध्ये ९० सेंटीमीटर अंतर ठेवावे. रोपे लावताना खोडाला जास्त दाब देऊ नये. त्यामुळे खोड कमजोर होऊन ते सुकण्याची शक्यता असते.
पुनर्लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. पुनर्लागवड झाल्यानंतर १० दिवसांनी मेलेली किंवा खराब झालेली रोपे काढून त्याजागी नवी रोपे लावावीत.
रब्बी हंगामातील टोमॅटो पिक फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्यास खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे आणि योग्य प्रमाणात खताचा वापर करावा. टोमॅटो पिकास आधार देण्याचे काम वेळेत पूर्ण करावे. योग्य पुनर्लागवडीमुळे टोमॅटोचे उत्पादन सुधारते आणि दर्जेदार उत्पन्न मिळते.












