Cultivation of Mulberry : शेतकरी पारंपरिक शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी विविध पर्याय शोधत असतात. त्यासाठी तुती लागवड हा एक फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. रेशीम शेतीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवता येते. तसेच हा व्यवसाय पर्यावरणपूरक असून, कमी पाणी आणि खतांच्या वापरामुळे टिकाऊ ठरतो.
तुतीचे झाड एकदा लावले की ते दहा ते पंधरा वर्षे टिकते. वर्षभरात चार ते पाच वेळा उत्पादन घेता येते. त्यामुळे नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. घरातील सर्वांना रोजगार मिळाल्याने मजुरीच्या खर्चात कपात होते. शिवाय, बाजारात रेशीम कोषांना चांगला दर मिळत असल्याने हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो.
राज्य शासनाने तुती लागवडीला चालना देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एका गावात किमान दहा शेतकऱ्यांनी तुती लागवड केल्यास त्यांना शासनाकडून अनुदान मिळते. या योजनेंतर्गत तीन वर्षांत अकुशल व कुशल मजुरीसाठी एकूण चार लाख अठरा हजार आठशे पंधरा रुपये अनुदान दिले जाते.
सिल्कसमग्र योजनेंतर्गत तुती लागवड, सिंचन सुविधा, कीटक संगोपन गृह आणि अन्य आवश्यक साधनांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. एका एकर तुती लागवडीसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये, तर अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना चार लाख पन्नास हजार रुपये अनुदान मिळते. दोन एकर लागवडीसाठी अनुक्रमे चार लाख अडसष्ट हजार सातशे पन्नास रुपये आणि पाच लाख बासष्ट हजार पाचशे रुपये अनुदान मिळते.
राज्यातील अनेक शेतकरी तुती लागवडीकडे वळत असून, शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. कमी खर्चात अधिक नफा मिळवण्यासाठी तुती लागवड हा शेतीपूरक व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे संपर्क साधावा












