सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये अडचणीत सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते .या निर्णया नंतर तीन महिने होऊनही निधी मिळाला नाही म्हणून शेतकरी संतापले होते. पण, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्रक जारी केल्या नंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते . यानुसार धान खरेदी पोर्टलवर नोंदणीकृत १ लाख २५ हजार १२५ गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे . या साठी २३९ कोटी ३३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध झाला आहे.
या हंगामामध्ये २४ लाख ७६ हजार ६२५ क्विंटल धानाची विक्री गोंदिया जिल्ह्यातील ८० हजार ७७७ शेतकऱ्यांनी केली आहे. ही खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ लाख क्विंटलने कमी आहे. ३०० कोटी ५१ लाख १८ हजार ३६० रुपये भंडारा जिल्ह्यासाठी , ८५ कोटी ३५ लाख ४७ हजार ७८० रुपये गडचिरोली जिल्ह्यासाठी , १५६ कोटी ४४ लाख ५० हजार ६४० रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी तर ७५ कोटी ७ लाख ९५ हजार ६६० रुपयांचा निधी नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोकणासह पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन घेतले जाते. राज्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या माध्यमातून गोंदियात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी विकास महामंडळाच्या उपअभिकर्ता संस्थांमार्फत आणि जिल्हा पणन अधिकारी कार्यालयकडून शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले जाते.केंद्र शासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी साधारण धानाला २,०४० रुपये व २,०६० रुपये ‘अ’ श्रेणी धानाला प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता.












