सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत नवीन स्वरूपामध्ये राबविण्यात येत असून . या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 15 तालुक्यात गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला, इगतपुरी, बागलाण, निफाड, दिंडोरी व चांदवड या तालुक्यातील इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. गोवंशाचा (भाकड गाई,वळू , अनुत्पादक, निरूपयोगी बैल, इ.) सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्यक देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे .
यापूर्वी 2021-22 मध्ये त्र्यंबकेश्वर आणि 2023-24 मध्ये नाशिक, देवळा, नांदगाव , मालेगाव, कळवण या सहा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गोशाळा याप्रमाणे निवड केली असून निवड करण्यात आलेल्या गोशाळेस त्यांच्याकडे असेलेली पशुधन संख्या विचारात घेवून अनुदान वाटप करण्यास मान्यता दिली आहे . या योजनेंतर्गत 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 15 लाख , 101 ते 200 पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 20 लक्ष तर 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 25 लाख एवढे अनुदान एकवेळेचे अर्थसहाय्य म्हणून दिले जाणार आहे .
सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ,अर्ज याबाबतचा तपशिल जिल्हा पशुसंवर्धन उपआयाक्त कार्यालय नाशिक तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे .