
uninterrupted irrigation : राज्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात अखंडित सिंचन सुविधा मिळावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
विधानभवनात २०२४-२५ उन्हाळी हंगामासाठी सांगली आणि सातारा पाटबंधारे कालवा सल्लागार समितीच्या बैठका पार पडल्या. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ तसेच धोम-कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांतील सिंचन व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह आमदार व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना नियोजनबद्ध सिंचन मिळावे यासाठी उपसा सिंचन योजनांसाठी कंत्राटी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी हंगामात प्रकल्पनिहाय पाणी वापर आणि सिंचन आवर्तनाचे प्रभावी नियोजन करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील पाणीसाठा आणि त्याच्या वितरणासंदर्भातही चर्चा झाली. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी कालव्यांतील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.