सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली रोगाला बळी न पडणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात !

black grapes

Sangli News: सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली रोगाला बळी न पडणारी, बाजारपेठेत मागणी असणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात !

पलूस : सावंतपूर (ता. पलूस) येथील प्रयोगशील शेतकरी जयकर राजाराम माने यांनी सलग नऊ वर्षे प्रयोग करून काळ्या द्राक्षाची ब्लॅक क्वीन बेरी (Black Kwin Berry) ही नवीन जात विकसित केली आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राने त्यांना प्रमाणपत्रही दिले आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून  शेतकरी येत आहेत.

माने यांनी पंधरा ते वीस वर्षांत शेतात माणिक चमन, सरिता, काजू, सुपर सोनाक्का, कृष्णा अशा विविध जातींच्या द्राक्षांचे उत्पन्न घेतले. वर्षभर लागणाऱ्या औषधांपेक्षा टाॅनिकचाच खर्च जास्त होत होता. हे परवडत नसल्याने रोगाला बळी न पडणारी, बाजारपेठेत मागणी असणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात विकसित करण्यास २०१२ पासून सुरुवात केली.

सुरुवातीला द्राक्षवेलीच्या एका काडीवर प्रयोग केला. जंगली द्राक्षवेलीवर वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या द्राक्षवेलीचे डोळे भरले. नवीन जात विकसित झाल्याची खात्री २०१९ मध्ये पटल्यानंतर परिसरातील बागायतदारांना ही काळी द्राक्षे दाखवली. नंतर तीन एकरामध्ये नवीन जातीची लागण केली. या नव्या जातीला मित्रांच्या मार्गदर्शनाने ‘ब्लॅक क्वीन बेरी’ असे नाव दिले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या (नॅशनल रिसर्च सेंटर) दिल्ली येथील सदस्यांनी सलग तीन वर्षे भेट देऊन या द्राक्षाचा अभ्यास केला. नवीन जातीचे वीस ते तीस नमुने घेऊन तपासणी केली. त्यानंतर पंधरा नोव्हेंबर २०२२ रोजी एनआरसीने या जातीला प्रमाणपत्र दिले.

सौजन्य : दै. लोकमत 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *