Creeping onion : रांगडा कांद्याची योग्यप्रकारे काढणी केल्यास त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि साठवणूक दीर्घकाळ करता येते. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर आणि कांद्याची पाने वाळू लागल्यानंतरच काढणी करणे आवश्यक असते.
रांगडा कांदा काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी शेतात पाणी देणे थांबवावे. त्यामुळे कांदा योग्य प्रकारे पक्व होतो, त्याचा वरचा सुकलेला पापुद्रा चांगला घट्ट बसतो आणि काढणीच्या वेळी कांद्याला इजा होण्याची शक्यता कमी होते.
कांद्याच्या ५० ते ७० टक्के माने वाकल्यानंतर काढणी करावी. जर पाने पूर्ण वाळली नाहीत, तर कांदा हाताने उपटून काढावा किंवा योग्य प्रकारच्या साधनांचा वापर करावा. जर कांद्याची मुळे जास्त वाळली, तर त्याला कुज येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कांद्याला योग्य वेळी काढणे आवश्यक आहे.
काढणी केल्यानंतर कांद्याला शेतातच २ ते ३ दिवस सुकू द्यावे. कांद्याची माने पूर्ण वाळल्यावर ती २ ते २.५ सेंटीमीटर लांब ठेवून कापावी. नंतर खराब कांदे वेगळे करून निवड करावी. उत्तम प्रतीचे कांदे गोळा करून सावलीत १० ते १२ दिवस वाळू द्यावेत. यामुळे कांद्याच्या साठवणीचा कालावधी वाढतो आणि सुकलेल्या भागातून रोगजंतूंना आत प्रवेश मिळत नाही.
रांगडा कांदा योग्य प्रकारे वाळवल्यास तो दीर्घकाळ टिकतो आणि बाजारात विक्रीसाठी अधिक चांगली किंमत मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काढणी आणि साठवणूक पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.












