
onion market:आज सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याची सकाळच्या सत्रात १४ हजार ५०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी १ हजार तर सरासरी २३५० रुपये बाजारभाव मिळाले. शनिवारी २५ जानेवारीच्या तुलनेत आज कांदा बाजारभावात सुमारे १०० ते दीडशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पिंपळगावला कांद्याचे सरासरी दर २२५० रुपये प्रति क्विंटल इतके होते. पुण्यात कांद्याचे सरासरी दर २२०० रुपये हे मागील आठवड्याच्या सुरुवातीइतकेच टिकून राहिलेले आहेत.
दरम्यान दोन आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात कांदा आवक वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या आठवड्यात सुरुवातीलाच कांदा बाजारभाव कमी झाल्याचे दिसून आले. राज्यासह देशपातळीवर कांदा आवक वाढताना दिसून येत असून त्यासंदर्भातील विश्लेषण पुढीलप्रमाणे
सोमवार दिनांक २० जानेवारी ते रविवार दिनांक २६ जानेवारी या सप्ताहात देशभरातील कांदा आवक एकूण ३ लाख ४८ हजार ६५९ टन होती. त्यात महाराष्ट्रातील कांदा आवक सर्वाधिक म्हणजे १ लाख ६१ हजार २६५ टन इतकी होती. त्याखालोखाल गुजरातची कांदा आवक ७४ हजार ७९५ टन इतकी होती. त्यानंतर उत्तर प्रदेशची आवक ३४ हजार ७९२ आणि मध्यप्रदेशची आवक १९ हजार ६२७, तर कर्नाटकची आवक १५ हजार ३६२ मे. टन इतकी होती. या काळात लासलगाव बाजारातील कांद्याच्या किंमती सरासरी २३०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान होत्या.
त्याआधी संपलेल्या म्हणजेच दिनांक १९ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात दिनांक १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान देशभरातील कांदा आवक ही कमी होती. म्हणजेच २ लाख ६४ हजार ३५१ मे. टन इतकी. त्यात महाराष्ट्रातील आवक १ लाख २६ हजार ३५३ मे. टन, गुजरातमधील आवक ४४ हजार ४९६ मे. टन इतकी होती. उत्तर प्रदेशमधील ३५ हजार १३२ मे. टन, मध्यप्रदेशमध्ये १३ हजार ६५३ मे. टन इतकी होती. कर्नाटकमध्ये ७ हजार ६१९ इतकी होती.
या काळात लासलगावमधील कांद्याच्या किंमती सरासरी किंमती १९५१ ते २२५१ रुपये इतक्या होत्या.
दरम्यान त्या आधीच्या आठवड्यात म्हणजेच संक्रांतीपूर्वी ६ ते १२ जानेवारी रोजी देशभरातील कांदा आवक ही ३ लाख ८१ हजार ३१९ मे. टन इतकी होती. त्यात महाराष्ट्रातील आवक ही १ लाख ९८ हजार २७९ मे. टन, तर गुजरामधील आवक ही ६६ हजार ७०२, उत्तरप्रदेशमधील आवक ३५ हजार ८२७ टन, मध्यप्रदेशमधील १८ हजार ७६९ मे. टन, तर कर्नाटकची आवक १७ हजार ५४ टन इतकी होती. या काळात नाशिकमधील लासलगाव बाजारातील किंमती कमीत कमी १७८० ते २५०० रुपये दरम्यान होत्या.