
Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या सरकारी हमीभाव खरेदीची मुदत दिनांक १२ जानेवारीला संपली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या पाठपुराव्याने केंद्र सरकारने ही मुदत पुन्हा ३१ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. राज्यात १४ लाख १३ हजार मे. टन खरेदीचे उदिष्ट असताना आजतागायत केवळ ४ लाख २७ हजार मे. टन खरेदी झाल्याने अजूनही ते उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर आता ३१ जानेवारीपर्यंत उदिष्ट पूर्ण होईल का याची उत्सुकता आहे.
दरम्यान या निर्णयानंतर आज बाजारात काय फरक पडला ते जाणून घेऊ. आज दिनांक १६ जानेवारी रोजी जळगाव आणि किनवट बाजारात हमीभावाने अनुक्रमे २२७ आणि १११ क्विंटल खरेदी झाली. हमीभाव ४८९२ रुपयांचा आहे.
काल दिनांक १५ जानेवारी रोजी राज्यात अहिल्यानगर बाजारात सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लातूर बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा होऊन जास्तीत जास्त बाजारभाव ४३०० रुपये तर सरासरी ४१५० रुपये प्रति क्विंटल असे होते. वाशिम बाजारात सोयाबीन जास्तीत जास्त ४९०० रुपये असे होते. तर सरासरी ४१६० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. जालना बाजारात सरासरी ४१०० रुपयांचा दर होता.
हमीभाव खरेदीच्या मुदतवाढीच्या निर्णयानंतर सोयाबीनच्या बाजारभावात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.