Kanda bajarbhav : आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच गुरूवारी कांद्याच्या आवकेने ३ लाख ६७ हजार क्विंटलचा टप्पा ओलांडल्याने बाजारावर ताण येऊन दोन दिवसांपासून बाजारभाव घसरले आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारी कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यात सरासरी २७०० रुपये क्विंटल होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी बाजारात लाल कांद्याची सुमारे ३ लाख ४७ हजार क्विंटल आवक झाली. त्यानंतर पुन्हा बुधवारी आवक घटली आणि गुरूवारी वाढली, परिणामी बाजारभाव घसरून आज शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारात २१५० रुपये प्रति क्विंटल असे राहिले.
या आठवड्यात बाजारात दिवसाआड कमी जास्त आवकेचा कल दिसून आला असला, तरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली आहे. सरासरी विचार करता या आठवड्यात दररोज सरासरी अडीच लाखांपेक्षा जास्त आवक होत आहे. परिणामी बाजारभाव २२ ते २४ रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. नाशिक जिल्हयातील आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता वाढत असून दरदरोज सरासरी एक लाख क्विंटलपेक्षाही आवक वाढली आहे.
आज शनिवारी आठवड्याच्या शेवटी पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याची १९ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले. पुण्याच्या मोशी बाजारात १६०० तर पिंपरी बाजारात २७०० रुपये सरासरी बाजारभाव मिळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाडला सरासरी २१०० रुपये, येवला बाजारात २१५० रुपये तर कराड बाजारात ३ हजार रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.












