Kolhapur Sangli irrigation : कोल्हापूर सांगलीच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती पाणी मिळणार ?

Kolhapur Sangli irrigation

Kolhapur Sangli irrigation : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी वाटपाचे नियोजन या बैठकीत करण्यात येते.

कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चारही मोठ्या सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, दूधगंगा आणि वारणा असे चार मोठे सिंचन प्रकल्प असून एकूण प्रकल्पिय सिंचनक्षेत्र १ लाख ८७ हजार ५८० हेक्टर आहे. जून २०२४ मधील आकडेवारीनुसार यातील निर्मित सिंचनक्षेत्र हे १ लाख ५६ हजार ८५० हेक्टर आहे. यातील दूधगंगा प्रकल्पात २५.३९ टीएमसी एकुण पाणीसाठा आहे.

दि. १५ ऑक्टोबर रोजीच्या आकडेवारी नुसार २१.२४ टीएमसी म्हणजेच ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यातील निव्वळ सिंचनासाठी ९.३५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. यातील अपेक्षित पाणीवापर ८.९८ टीएमसी असून उन्हाळी हंगामा अखेर ०.३७ टीएमसी पाणीसाठी शिल्लक राहणार आहे.
वारणा प्रकल्पातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा २७.५२ टीएमसी असून १३.५५ टीएमसी पाणीसाठा सिंचनासाठी उपलब्ध आहे. यातील रब्बी व उन्हाळी हंगामातील अपेक्षित पाणी वापर ८.२२ टीएमसी आहे. यानंतर उन्हाळी हंगामाखेर ५.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.

राधानगरी मोठ्या प्रकल्पातील सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा ९.५ टीएमसी आहे. यातील रब्बी व उन्हाळी हंगामातील अपेक्षित पाणीवापर ७.४ टीएमसी आहे. उन्हाळी हंगामा अखेर शिल्लक राहणारा पाणीसाठी हा २.०३ टीएमसी असणार आहे. तुळशी धरणातील सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा हा ३.०२ टीएमसी असून रब्बी व उन्हाळी हंगामातील अपेक्षित पाणीवापर १.४ टीएमसी आहे. उन्हाळी हंगामानंतर १.५५ टीएमसी पाणीसाठी शिल्लक राहणार आहे.

Leave a Reply