Banana farming : सध्या थंडीचे वातावरण असून किमान तापमानात झालेल्या घटीमूळे थंडी पासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. तसेच केळी आणि फळबागेसाठी पुढील प्रमाणे शिफारस केली आहे.
केळी बाग काळजी…
१. केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पध्दतीने पाणी द्यावे.
२. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी).
३. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
४. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा आणि द्राक्ष काळजी..
१. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
३.किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून, द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत.