Kisan Kavach Body Suit : शेतात औषधे, किटकनाशके यांची फवारणी करताना शेतकऱ्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आता त्या परिणामांपासून वाचण्यासाठी किसान कवच नावाने कीटकनाशक विरोधी संपूर्ण स्वदेशी सूटची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला नाव दिलेय किसान कवच.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ जितेंद्र सिंह यांनीनवी दिल्ली येथे किसान कवच या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचे अनावरण केले. कीटकनाशकांच्या हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले, हे अभिनव संशोधन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते.
सेपियो हेल्थ प्रा.लि.च्या सहकार्याने ब्रिक-इनस्टेम, बंगलोर यांनी विकसित केलेला हा बॉडीसूट आहे. त्याच्या वापरामुळे फवारणीमुळे शेतकऱ्यांना होणारे श्वसनाचे विकार, दृष्टी जाणे आणि काहीवेळा मृत्यू यासह अनेकदा गंभीर आरोग्य समस्यांवर मात करता येणे शक्य आहे.
“किसान कवच धुता येण्याजोगा आणि पुन्हा वापरता येण्याजोगा हा सूट असून त्याची किंमत 4,000 रुपये आहे, एका वर्षापर्यंत टिकू शकतो आणि त्यात संपर्कात आल्यावर हानिकारक कीटकनाशके निष्क्रिय करण्यासाठी प्रगत फॅब्रिक तंत्रज्ञान वापरले असल्याने शेतकरी सुरक्षित राहतो.
दरम्यान कार्यक्रमात शेतकऱ्यांना किसान कवच सूटच्या पहिल्या बॅचचे वाटप करण्यात आले, जे भारतातील कृषी क्षेत्रातील 65% लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे . डॉ. जितेंद्र सिंह यांनी आश्वासन दिले की, उत्पादन वाढले की सूट देखील किफायतशीर किंमतीत उपलब्ध होतील ,ज्यामुळे देशभरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध होतील.