Maharashtra weather update : पुढील आठवड्यात राज्यात कशी असेल थंडी; पाऊस पडणार का?

Maharashtra weather update: सध्या उत्तरेकडे थंडी आणि धुक्याचे साम्राज्य असून मागील दोन दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि परिसराला धुक्याने वेढले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना व प्रवास करताना तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

दरम्यान सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात सकाळची आर्द्रता ७० ते ८० % म्हणजे सरासरी इतकी जाणवत आहे. त्यामुळे वातावरण अति ढगाळ नसले तरी निरभ्रतेऐवजी आकाशात काहीसे मळभाची चादर सध्या जाणवत आहे.

दुपारी ३ चे कमाल तापमान हे ३३ डिग्री से. ग्रेड म्हणजे सरासरीच्या जवळपास दोन पासून ते चार डिग्रीपर्यंत वाढलेले जाणवत आहे. तर पहाटेचे किमान तापमान २० ते २२ डिग्री से. ग्रेड म्हणजे दोन ते तीन डिग्रीपर्यन्त वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा व रात्री थंडीऐवजी तेथे ऊबदारपणा जाणवत आहे.

उर्वरित खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण २९ जिल्ह्यात मात्र कमाल तापमान सरासरीच्या खाली तर पहाटेचे किमान तापमानातील वाढ ही सरासरीपेक्षा अत्याधिक आहे. त्यामुळे शनिवार दि.११ जानेवारीपासून  संपूर्ण महाराष्ट्रात दिवसा गारवा जाणवत आहे तर रात्री थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.

थंडीचा हा प्रभाव, ओरिसा दरम्यान असलेल्या प्रत्यावर्ती म्हणजे घड्याळ काटा दिशेप्रमाणे वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्यामुळे, बं.उपसागराततून  महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे  पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारी पर्यंत असाच कमी जाणवणार आहे, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

आठवड्यानंतर मात्र, त्यापुढील तीन दिवस म्हणजे, सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, थोडक्यात जानेवारी महिन्याच्या उर्वरित दिवसात थंडीचा चढ-उतार असाच जाणवेल, दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.

 प्रशांत महासागरात अपेक्षित  ‘ ला- निना ‘चे अस्तित्व आढळू लागले आहे.  सध्याचे त्याचे हे अस्तित्व  कमकुवत स्वरूपाचेच अल्प कालावधीचे असल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर विशेष जाणवणार नाही, असेही श्री. खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *