
Israel-Iran War : मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर आर्थिकदृष्ट्याही जागतिक स्तरावर जाणवण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढू लागल्याने, भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये चिंता वाढली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम भारतातील इंधन दरांपासून ते शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर कसा होऊ शकतो, याचे सविस्तर विश्लेषण जाणून घेऊ
इस्रायल-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर धोका निर्माण झाला आहे. Hormuz जलसंधी मार्ग, जिथून जगातील एक तृतीयांश कच्चे तेल वाहून नेले जाते, जर बंद झाला तर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ब्रेंट क्रूडचे दर 75 ते 80 डॉलर दरम्यान आहेत. मात्र, बाजारात भीती वाढली, तर ही दरवाढ तात्काळ होऊ शकते.
सध्या भारत इराणमधून तेल आयात करत नसला, तरीही या संभाव्य इंधनवाढीचा सर्वात मोठा फटका भारताला बसू शकतो. भारत ८५ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची गरज आयात करून भागवतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह सर्व प्रकारच्या इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम केवळ वाहतूक आणि वाहने यांच्यापुरता मर्यादित राहत नाही, तर उत्पादन खर्च, माल वाहतूक खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही होतो. विशेषतः शेतकऱ्यांसाठी खतं, डिझेलवरील अवलंबून असलेली सिंचन साधने, ट्रॅक्टर यांसाठीचा खर्च वाढेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात जर इंधन महाग झाले, तर भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. उच्च वाहतूक खर्चामुळे भारतीय मालाची स्पर्धा कमी होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, कांदा, केळी, तांदूळ यांसारख्या मालाच्या निर्यातीसाठी कंटेनर शिपिंगचा खर्च वाढल्यास व्यापाऱ्यांची निर्यात क्षमता कमी होऊ शकते. यामुळे स्थानिक बाजारात साठा वाढून दर घसरू शकतात आणि शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो.
दुसरीकडे, जर इंधनवाढीमुळे काही देश आपली आयात कमी करू लागले, तर भारतासारख्या देशांमध्ये काही शेतीमालाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. उदा. सस्ते दरात तांदूळ किंवा गहू निर्यात करणाऱ्या देशांची निवड करताना भारत प्राधान्य मिळवू शकतो. मात्र त्यासाठी सरकारने योग्य वेळी निर्णय घ्यावा लागेल.
शेतीमाल आयात बाबतीतही धोका आहे. उदा. खाद्यतेल, विशेषतः पामतेल आणि सोयातेल हे मोठ्या प्रमाणावर मलेशिया, इंडोनेशिया आणि अमेरिका यांच्याकडून आयात होते. तेलवाढ झाल्यास हे सर्व खाद्यतेल महाग होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या स्वयंपाकघरावर होऊ शकतो. मात्र सोयाबीन आणि तेलबियांना चांगले दर मिळू शकतात.
एकूणच इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता, भारताच्या अर्थव्यवस्थेवर, इंधन दरांवर, आणि शेतमाल व्यापारावर स्पष्ट परिणाम करू शकतो.