१ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला होता आता सध्या अंतिम टप्प्यात आला आहे . .यंदाच्या ऊस गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यामध्ये ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १०.१७ टक्के सरासरी इतका यंदाचा साखर उतारा आहे.
मागील वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत ९.९७ टक्के इतका हाच उतारा होता. दरम्यान, साखरेच्या उताऱ्यानुसार उसाचा किमान आधारभूत दर हा निश्चित होत असल्यामुळे साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उतारा सर्वाधिक असलेल्याशेतकऱ्यांच्या उसाचा दर वाढण्यास मदत होणार आहे.
राज्यामध्ये सर्वाधिक साखर उतारा सरासरी ११.५ टक्के इतका हा कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा आहे. त्यामुळे या वर्षी या विभागातील ऊस उत्पादकांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे . साखर उताऱ्याच्या टक्केवारीमध्ये सरासरी दुसऱ्या क्रमांकावर नांदेड विभाग , तर तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे.
नागपूर विभागातील साखर उतारा हा राज्यामध्ये सर्वांत कमी आहे आणि ५.८१ टक्के इतका आहे. त्यामुळे अन्य विभागातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळेल . या वृत्तास दुजोरा राज्याच्या साखर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनकडून मिळाला आहे . राज्यात एकूण साखर कारखान्यांचे आठ विभाग आहेत ,ऊस गाळप हंगाम सर्व विभागांतील मिळून २०७ साखर कारखान्यांनी सुरू केला आहे.
उसावर आंदोलनाचा परिणाम झाला का?
एक नोव्हेंबरपासून महाराष्ट्रामधील साखर कारखाने सुरू झाले होते परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या मुद्दावरून साखर कारखाने बंद पाडले होते . त्यावेळी ३ आठवडे साखर कारखाने बंद होते व तोडगा निघाल्या नंतर सुरू करण्यात आले .
मात्र याचा परिणाम ऊस उत्पादन घटीवर होईल असे सांगितले जात होते, परंतु राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा उत्पादनात व साखरेचा उताऱ्या मध्ये आघाडीवर राहिला असल्यामुळे ऊस उत्पादनावर ऊस आंदोलनाचा फारसा काही परिणाम झाला नाही ,असे दिसून येत आहे.












