मजूरांच्या समस्येमुळे राज्यात यांत्रिक ऊसतोडणीकडे वाढता कल..

सध्या महाष्ट्रात ऊस गाळप हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी ऊस तोडणी जोमात सुरू आहे. बहुतेक ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या माध्यमातून ही ऊस तोडणी होत असली, तरी अलीकडच्या काळात यांत्रिक ऊसतोडणी होताना दिसत आहे. त्यात अनेक साखर कारखान्यांनी स्वत:ची ऊसतोडणी यंत्रे घेतल्याचे दिसते.

सध्या राज्यात सुमारे १ हजार ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून ऊस तोडणी सुरू असल्याचा अंदाज आहे. एका यंत्राद्वारे दिवसाला सुमारे सव्वाशे ते दीडशे टन ऊसाची तोडणी होते. दुसरीकडे तितकाच ऊस तोडण्यासाठी एका दिवसाला किमान १०० ते सव्वाशे ऊसतोड कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या यांत्रिक ऊसतोडणीकडे कल वाढत आहे.

महाराष्ट्रात खरीपाचे क्षेत्र साधारणत: १८० लाख हेक्टर आहे, तर रब्बी पिकाचा पेरा सरासरी ५५ ते ८० लाख हेक्टरवर होतो. त्यातील ऊसाचे क्षेत्र वाढत चालले असून सुमारे ११ लाख टनावर ऊस एकट्या महाराष्ट्रात होते. सिंचनाचे क्षेत्र आणि वाढीव एफआरपी यामुळे अनेक शेतकरी ऊसाच्या शेतीकडे वळले आहेत. या सर्व ऊसाच्या तोडणीसाठी मजूरांची संख्या कमी होत आहे.

नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ऊस पट्ट्‌यात यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले जाताना दिसत आहे.

ही आहेत यांत्रिकीकरणाची कारणे
१. सुलभपणे ऊस तोडणी
२. मजूरांची टंचाई व समस्या
३. ऊसतोड मजुरांची पुढची पिढी शिकून नोकरी व व्यवसायात येत असल्याने त्यांनी हे काम करणे नाकारले आहे.
४. कमी वेळात जास्त काम होते.
५. ऊस वेळेवर कारखान्याला जातो

यांत्रिक तोडणीला मर्यादा
१. अर्धा एकर ऊसाचे क्षेत्र असेल, तर तोडणीला मर्यादा
२. तळापासून ऊस तोडणी होत नाही, त्यामुळे ऊस वाया जाऊ शकतो.
३. यंत्र आणि ट्रॉली सोबतच काम करत असल्याने जागा जास्त लागते.
४. पाणथळ आणि अडचणीच्या जागेत यंत्र जात नाही
५. मोठे क्षेत्रफळ असलेल्या ठिकाणीच ऊसतोडणी शक्य आहे.
४. सध्या तरी जास्त लागवड क्षेत्र असलेल्या ऊस क्षेत्रातच तोडणी शक्य

Leave a Reply